पुणे : शिक्षण मंडळाने ४० शाळांकरिता ५ कोटी ७० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या वीज अटकाव यंत्रणेची खरेदी बेकायदेशीरपणे झाली असून, त्यात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सुराज्य संघर्ष समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाकडे करण्यात आली आहे. कोणतीही निविदा न काढता ही खरेदी केल्याने सहभागी अधिकारी व ठेकेदार यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.शिक्षण मंडळाकडील सर्व अधिकार काढून घेण्यापूर्वी सन २०१३-१४ मध्ये त्यांच्याकडून वीज अटकाव यंत्रणेची खरेदी करण्यात आली आहे. टर्सेल कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी नसलेल्या केंद्रीय भांडार या संस्थेकडून ही खरेदी करण्यात आली. या संस्थेचा इतर कोणत्याही शासकीय संस्थेशी दर करार झालेला नाही. मनपाच्या ४० शाळांवर ही यंत्रणा बसविण्यात आली. एका यंत्रणेकरिता ४ लाख ५० हजार रुपये खर्च आला. पालिकेची कोणतीही शाळा ३ मजल्यांपेक्षा मोठी नाही, त्याकरिता ५० ते ६० हजार रुपयात वीज अटकाव यंत्रणा उपलब्ध होणे शक्य होते. त्याची खातरजमा केली नसल्याची तक्रार सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी केली आहे. नियमानुसार निविदेत एकाच मेकचा किंवा विशिष्ट उत्पादनाचा उल्लेख करता येत नाही. मात्र, निविदेत फास्ट अर्थ इलेक्ट्रोडचे आॅथराझेशन असावे, अशी अट टाकण्यात आली. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन संबंधित ठेकेदार, पालिका व शिक्षण मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डी. पी. प्रधान यांच्याकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वीज अटकाव यंत्रणेची खरेदी बेकायदेशीर
By admin | Published: February 09, 2015 4:05 AM