चाकण : भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युतीचे सरकार असल्याने आळंदीकरांना लवकरच शुद्ध पाणी देणार, असे आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत सांगितले.तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. आळंदी पालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्षा अंजना कुऱ्हाडे, नगरसेवक अशोक कांबळे, अलका बवले, वर्षा कोद्रे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे, रमेश गोगावले, अॅड. विलास काटे, महादेव पाखरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.गोरे म्हणाले की, भामा आसखेडचे पुण्याला जाणारे पाणी आळंदीतून जात असल्याने प्रथम आळंदीकरांना पाणी देत नाही, तोपर्यंत पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनचे काम अडविले जाणार आहे. आळंदी आणि परिसरातील गावांना भामा आसखेडचे पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या शासन स्तरावरील अंतिम टप्प्यातील आळंदी शहर प्रारूप विकास आराखड्यास मुख्यमंत्री स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून कामे संथ गतीने होत आहे, शहरातील रस्ते, गटारे, पिण्याची पाईपलाईन ही कामे निधी असूनही वेळेत झाली नाहीत. लवकरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची आळंदीत बैठक होऊन कामे गतीने होण्यासाठी भर देणार आहे. रस्त्यांचा विकास करताना, अतिक्रमण कारवाई करताना हयगय केली जाणार नाही. कामे वेळेत झाली नाहीत तर निधी पुन्हा माघारी जाण्याची शक्यता असल्याची माहिती गोरे यांनी दिली. (वार्ताहर)आळंदी पालिकेने जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत मिळालेल्या सत्तर लाख निधी आणि पालिकेच्या वीस लाख असे एकूण नव्वद लाख रूपयांतून आळंदीतील सिद्ध बेट मधील जलशुद्धीकरण यंत्रणेतील जुनाट यंत्रे, व्हॉल्व, पाईप बदलण्याचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड, फिल्टर मीडिया बनविण्याचे काम झाले आहे. सेटलिंक टँक बनविला असून, लवकरच दोन दिवसांत आळंदीकरांना पूर्वीपेक्षा चांगले पाणी मिळणार आहे.- विनायक औंधकर, मुख्याधिकारी