लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चवीला गोड, गडद काळा रंग आणि जास्त गर असलेल्या कोकणातील जांभळाची पुण्यातील मार्केट यार्डातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. बाजारात दाखल होत असलेली टपोरी जांभळे ग्राहकांना भुरळ पाडत असून, घाऊक बाजारात या जांभळास दर्जानुसार किलोस २०० ते २५० भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात ३०० ते ४०० रूपये किलो या दराने या जांभळांची विक्री केली जात आहे.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सिंधुदुर्ग, बांदा, सावंतवाडी आदी भागांतून दररोज सुमारे १०० किलोइतकी जांभळाची आवक होत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जांभळाची आवक सुरू होते. यंदा १० ते १२ दिवस आधीच आवक सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक जांभळाच्या हंगामाच्या महिनाभर अगोदर गुजरात, कर्नाटक भागातून जांभळाची आवक होत होती. यंदा मात्र कोकणातील जांभूळ परराज्याच्या तुलनेत अगोदर दाखल झाले आहे. मंगळवारी मार्केटयार्डातील प्रकाश निवृत्तीनाथ घुले यांच्या गाळ्यावर सुमारे ५० किलो जांभळाची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलोंच्या एका पाटीस २००० ते २५०० रूपये भाव मिळत आहे.
याबाबत जांभळाचे व्यापारी अजित घुले यांनी सांगितले, कोकण भागातील जांभळाचा हंगाम एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत सुरू असतो. सध्या बाजारात दाखल होणा-या जांभळाचे प्रमाण कमी असले तरी पुढील आठवड्यापासून जांभळाची आवक सुरळित सुरू होईल. कोकणतील जांभळाचा दर्जा चांगला असून, आकाराने मोठे, रसरशीत आणि चवीला गोड आहे. त्यामुळे या जांभळाला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. मधुमेहासाठी जांभुळ उपयोगी ठरत असल्याने मागील काही वर्षांपासून त्यास मागणी वाढली आहे. पुढील काही दिवसांनंतर गोवा, गुजरात, कर्नाटकसह पुणे जिल्ह्यातून जांभळाची आवक सुरू होईल. आवक वाढल्यानंतर जांभळाचे भाव आवाक्यात येतील.