पुणे : आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले.इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या पुणे लोकल सेंटरच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. पद्मश्री अरुण फिरोदिया, डॉ. सुरेखा देशमुख, डॉ. गिरिश मुंदडा, अविनाश निघोजकर, वसंत शिंदे उपस्थित होते.
पायाभूत सुविधा व स्मार्ट सिटी प्रकल्पासंबंधी सादरीकरण करताना जगताप यांनी सांगितले, की पुणे महामेट्रो, बीआरटीएस, पुणे पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा, पुणे हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रोड, झोपडपट्टी निवास, २४ बाय ७ पाणी पुरवठा, नदी परिसर व विकास, घनकचरा व्यवस्थापन आदी विविध प्रकल्पांचा धावता आढाव घेण्यात आला. एकात्मिक विकासासाठी पुणे पालिका, पीएमपीएम, पीएमआरडीए, महामेट्रो, एसआरए व इतर शासकीय संस्थाशी भागीदारी व समन्वय साधत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.