पुणे : इंजिनिअर पतीच्या परफेक्शनला आणि मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून उच्च शिक्षित पत्नीने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पिंपरी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली आहे.कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी झालेल्या पूजा यांचा २००८ साली इंजिनिअर असलेल्या तुषारशी (नावे बदलेली) विवाह झाला होता. लग्नानंतर पतीकडून रोजच नियमांचा पाढा वाचलाच जाऊ लागला. घरातील कामाबाबत वेगवेगळ्या अटी घालत त्याचे त्रास देणे सुरू झाले. घरातील सर्व खर्चाचा हिशेब एक्सेल सीटमध्ये भरायचा, काही काम असल्यास मेल करायचा असा नित्यनियमच त्याने आखूण दिला होता. त्यात जर काही चूक झाली तर पतीचा मार खावा लागत. पटत नसल्यामुळे आॅक्टोबर २०१७ पासून पीडिता विभक्त राहत होत्या. अखेर त्यांच्या वतीने आता अॅड. सुप्रिया डांगरे यांनी याचिका दाखल केली आहे. तसेच तुषारकडून पूजा यांच्यावर अनैसर्गिक अत्याचारही झाल्याचे याचिकेतून समोर आले आहे.दररोजची कामे ठरवून देत त्याने तिला एक्सेल सीटमध्ये तीन कॉलम करून पूर्ण, अपूर्ण आणि काय तसेच काम न झाल्याची कारणे याचा तक्ता भरून नोंदी ठेवणे बंधनकारक केले. एखादे काम पूर्ण का झाले नाही याचे कारणही त्याठिकाणी तिला नमूद करावे लागत होते. पूजा करणे, दळण आणणे, कोणते कपडे घालायचे, गाडी वापरणे, जेवण करणे, दुसऱ्यांशी बोलणे अशा विविध गोष्टींचा त्याने नियम तयार केला होता व त्याचे पालन त्यांनी न केल्यास त्रास दिला जात होता. दर शुक्रवारी आठवडाभरात कोणती कामे केली, याचा आढावा त्यांना पतीला द्यावा लागत होता. तसेच नाष्ट्याला मेनू काय असावा आणि तो बनविण्यासाठी किती साहित्य लागेल याचेही गणित केले जाई. पतीकडून परवानगी मिळाली तरच त्यांना घरात तो पदार्थ बनवता येत होता. तर एखादी वेगळी गोष्ट त्यांना घरात करायची झाल्यास पतीला मेल पाठवून त्या गोष्टीसाठी संमती घ्यावी लागत होती.मुलीला देखील करायचा मारहाणपोटच्या सहा वर्षांच्या मुलीला देखील तुषार त्रास देत. किरकोळ कारणावरून तिला मारहाण करणे. एकदा तर तिला पाचव्या मजल्यावरून फेकून देण्याचाही प्रयत्न केला होता. रागात तिला चाकूचा धाक दाखवत पळवून मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करून तिला घराबाहेर ठेवणे असे प्रकार तुषार करीत असल्याचे याचिकेतून पुढे आले आहे.चपातीच्या आकाराची मोजणीचपातीचा आकार २० सेंमीच पाहिजे, असा अजब नियम तुषारने केला होता. दररोज तो त्याची तपासणी करत. तपासणीमध्ये चपातीचा आकार कमी अथवा जास्त झाल्यास तो पूजाला शिवीगाळ व मारहाण करायचा, असे याचिकेत नमूद केले आहे.