पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा....’ च्या आरोळ्यांनी रविवार (दि. १४) पासून भरत नाट्य मंदिर दणाणणार आहे. निमित्त आहे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे. यात ५१ महाविद्यालयांचे संघ सहभागी होणार असून, विद्यार्थ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ‘सीन्स यू आर हिअर’ या एकांकिकेने रविवारी सायंकाळी पाच वाजता प्राथमिक फेरीला प्रारंभ होत असून, दि. २९ ऑगस्टपर्यंत ही फेरी रंगणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे ही पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. कोरोनामुळे २०२० मध्ये ही स्पर्धा होऊ शकली नाही. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर, नाट्यगृहे उघडल्यानंतर गतवर्षीची (२०२१) स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये झाली. आता जवळपास सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा तरुणाईच्या हक्काची ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा ५७ वी स्पर्धा असून, प्राथमिक फेरी १४ ते २९ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.ही प्राथमिक फेरी दररोज सायंकाळी पाच वाजता रंगणार असून, यात रोज तीन संघांच्या एकांकिकांचे सादरीकरण होईल. सोमवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी या एकांकिकांचे सादरीकरण होणार नाहीत. दि. २९ ऑगस्टला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्सच्या ‘क्षणार्ध’ या एकांकिकेने प्राथमिक फेरीचा शेवट होईल.