लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लहान मुलांसाठी पंचतंत्रातल्या गोष्टींवर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये ७ ते १० वर्षे वयोगटात पूर्वा भागवत हिने तर ११ ते १४ वर्षे वयोगटात पूर्वा सुतारने प्रथम क्रमांक मिळविला.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा घेण्यात आली. मात्र, या स्पर्धेला मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे निकाल जाहीर करायला वेळ लागल्याचे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी सांगितले.
पहिल्या गटात (७ ते १०) पूर्वा भागवत (प्रथम क्रमांक), अद्वय पाटील व साई जाधव (द्वितीय क्रमांक), विद्या राव (तृतीय क्रमांक) तर मिहिका फडके, श्रीजित वेदपाठक, देवयानी भारद्वाज, ईशान पवार व सावनी दात्ये (उत्तेजनार्थ) विजयी ठरले. दुसऱ्या गटात (वय ११ ते १४) पूर्वा सुतार (प्रथम क्रमांक), साज नामजोशी (द्वितीय क्रमांक),यशराज खैरे (तृतीय क्रमांक) आणि के. साई दर्शनी, अवंतिका राव, साक्षी कुसुमाडे, कनक वानखेडे व शार्दूल अलावंडी (उत्तेजनार्थ) विजयी घोषित करण्यात आले.
ही स्पर्धा ७ ते १० आणि ११ ते १४ अशा दोन वयोगटात घेण्यात आली व त्यात एकूण १४८३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापैकी ६८७ मुलांचे व्हिडीओ पहिल्या फेरीसाठी पात्र झाले, तर यातील ४७५ जणांचा दुसऱ्या व अंतिम फेरीत प्रवेश झाला. अंतिम फेरीतील प्रश्नमंजूषेतील उत्तीर्णांच्या कसोटीवर निकाल जाहीर झाला आहे.
--
अशी झाली स्पर्धा...
संपूर्णपणे इंग्रजी भाषेतून झालेल्या या स्पर्धेत पंचतंत्रातल्या गोष्टींमधून कोणत्याही पाच गोष्टी निवडून त्याचे पाठांतर करून त्याचा व्हिडीओ काढून ऑनलाईन पध्दतीने संस्थेकडे स्पर्धकांनी पाठवले होते, तर दुसऱ्या फेरीत बहुपर्यायी प्रश्नावली दिली होती. पंचतंत्रातील व्यवहार, राजनीती व चातुर्याच्या विचारप्रवर्तक गोष्टी मुलांना वाचायला मिळाव्यात, हा उद्देश सफल झाल्याचे समाधान आहे. याबाबत ओम पब्लिकेशन्सच्या ३६५ पंचतंत्र स्टोरीज या इंग्रजी पुस्तकातील कथांचा उपयोग मुलांनी करण्यास परवानगी दिली होती. अंतिम फेरीतील प्रश्नमंजूषेतील उत्तीर्णांच्या कसोटीवर अंतिम निकाल जाहीर झाला आहे.