पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुणे शहरातील विविध शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, मुलींनी बाजी मारली आहे. दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुस्कान वासंदानी हिला ९९.६० टक्के गुण मिळाले आहे.दहावीच्या एकूण निकालाची टक्केवारी ९६.२१ एवढी आहे. देशभरात मुलींनी बाजी मारली असून, पुण्यातील शाळांमध्येही हीच स्थिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, बहुतेक शाळांमध्ये मुलींनी आघाडी घेतल्याचे दिसून आले; तसेच अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही १०० टक्के लागला आहे. या शाळेत अर्जुन चौधरी हा विद्यार्थी ९६.८ टक्के गुण मिळवून पहिला आला. सुरक्षा जामवाल आणि अंजली गंगवार या विद्यार्थिनींनी अनुक्रमे ९६.२ आणि ९६ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. भूगावातील संस्कृती स्कूलने या वर्षी घेण्यात आलेल्या सीबीएसई परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेले आहे. याही वर्षी संस्कृती स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. संस्कृती स्कूलच्या वेदा ध्रुव व सौभाग्या कौशल या विद्यार्थिनींनी ९५.४० गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला. प्रशालेच्या ११ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला. तसेच, प्रशालेतील ७२ टक्के विद्यार्थ्यांना ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून परीक्षेसाठी ९६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना १० क्युमिलिटिव्ह ग्रेड पॉइंट अव्हरेज (सीजीपीए) पॉइंट्स मिळाले आहेत, तर एअर फोर्स स्टेशन येथील केंद्रीय विद्यालयातील १६० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २९ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए पॉइंट्स मिळाले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधील ९५ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए पॉइंट्स मिळाले. डाएट येथील केंद्रीय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छादिल्ली पब्लिक स्कूलमधील मुस्कान वासंदानी या विद्यार्थिनीने ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत. तिला संशोधनाची आवड असल्याचे सांगून ती म्हणाली, याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. वडील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक असून, आई डॉक्टर आहे. परीक्षेसाठी दररोज चार ते पाच तास अभ्यास केला. कोणतेही क्लास लावले नाहीत. निकाल पाहून खूप आनंद झाला. माझी आई आणि शाळेतील शिक्षकांना या यशाचे श्रेय देते, असे मुस्कान म्हणाली.
पुण्यात मुस्कान वासंदानी अव्वल
By admin | Published: May 29, 2016 3:50 AM