नीलेश जंगम, पिंपरीमराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तसेच राजकीय नेते, साहित्यिक, क्रीडापटू, इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्या घात-अपघाताच्या बातम्यांच्या अफवांचे व्हॉट्स अॅपवर फैलाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणताही विचार व खात्री न करता अनेक लोक आपल्या मोबाइलवर आलेल्या बातम्या इतर लोकांना व मोबाइलवरील अन्य ग्रुपवर पोस्ट करीत आहेत. त्यामुळे अनेकांचा संभ्रम होत आहे. ज्यांच्या बाबतीत या अफवा पोस्ट केल्या जातात, त्यांच्यासाठी व त्यांच्या निकटवर्तीयांसाठी ही बाब धक्कादायक असते. सामान्यांसाठी सुद्धा ही चकवा देणारी बातमी असते. मोबाइल फोन ही काळाची गरज झाली आहे. शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. सोशल मीडियामुळे अनेक लोक जोडले गेले आहेत. मोबाइलवरील ‘व्हॉट्स अॅप’ या अॅपच्या माध्यमातून आबालवृद्धाचे ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपवर आठवणी, जोक्स, मॅसेज, फोटो एका क्षणात प्रसारीत करण्यात येतात. याचे जितके चांगले परिणाम आहेत, तितकेच वाईटही. खात्री नसलेली एखादी खोटी बातमी तिच्या परिणामांची चिंता न करता झपाट्याने प्रसार होतो.
‘व्हॉट्स अॅप’वरील संदेशाचा नातेवाइकांना धक्का
By admin | Published: October 02, 2015 12:56 AM