पुणे : राज्यातील नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांना त्यांची संलग्नता का काढून घेण्यात येऊ नये ? याबाबत विद्यापीठांनी नाेटीस पाठवावी. तसेच त्यानंतरही नॅक मूल्यांकन केले नाही अशा महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांना दिली.
शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी पुणे येथे राज्यातील चार विद्यापीठांचे कुलगुरू आणि कुलसचिव यांची बैठक घेतली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठ या विद्यापीठांचा समावेश हाेता.
यात नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढण्याबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठांनी काय कार्यवाही केली, याचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, उच्च शिक्षण विभाग तसेच विद्यापीठांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करण्याबाबत महाविद्यालये उदासीन असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून का घेऊ नये ? अशी नाेटीस त्यांना पाठवा तसेच नाेटीस दिल्यानंतरही नॅक मूल्यांकन केले नाही, अशा महाविद्यालयांची यादी संबंधित विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.