भोर : किती ईडी, सीबीआय, आयटी लावली, पक्ष फोडले, नेते तोडले तरीही लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.
हरिश्चंद्र (ता. भोर )येथील खा. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभेच्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी माजीमंत्री शरद पवार, माजीमंत्री बाळासो थोरात, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, अशोक मोहोळ, विदुरा नवले, विजय कोलते, कुलदीप कोंडे, स्वरूपा थोपटे शंकर मांडेकर, शैलेश सोनवणे, मानसिंग धुमाळ, यशवंत डाळ, संदीप नागरे, विठ्ठल शिंदे, रवींद्र बांदल, संतोष रेणुसे, गणेश खुटवड उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार पितामह असून या वयातही मैदानात लढत आहेत. आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू, मात्र गद्दारांना कदापि माफी नाही. ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. त्यासाठी निष्ठावंत मावळ्यांनी कामाला लागा. मोदींच्या विरोधात शरद पवार, उद्धव ठाकरे आणी राहुल गांधी लढत आहेत. त्यांच्या पाठीमागे उभे राहू. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. शहा बोलतायत मिशन ४५ नाही तर तुम्ही कमिशनचा विचार करा, अब की बार चारशो पार नाही तर भाजप तडीपार अशी टीका राऊत यांनी केली. संग्राम थोपटे निष्ठावंत असून, छत्रपतीच्या मावळ्यासारखे काम करत आहेत.