वडगाव मावळ : प्रत्येक गावाची सण उसत्व साजरा करण्याची एक आगळी वेगळी परंपरा असते. मात्र, ह्या गावात धुलिवंदनाच्या दिवशी आयोजित होणारी ही अनोखी स्पर्धा पाहून बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही स्पर्धा व्यायामाशी निगडित असते. नियमित व्यायामाचा भाग असलेल्या जोर बैठका मारताना अनेकांचा घाम निघतो. या स्पर्धेत तर तब्बल ८५ किलो वजनाचा दगडी गोटा मानेवर ठेवून १८० बैठका मारणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. या स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला. वडगाव येथील श्री पोटोबामहाराज मंदिरा प्रांगणात जुन्या काळापासून जयबजरंग तालीम मंडळाच्या वतीने धुलिवंदनाच्या दिवशी पारंपारिक स्पर्धा भरविली जाते. यामध्ये ८५ किलो वजनाचा दगडी गोटा मानेवर ठेवून बैठका मारण्याची अनोखी स्पर्धा भरविण्यात येते. यांमध्ये अनेका स्पर्धकांनी भाग घेतला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी ८५ किलो वजनाची दगडी गोटी मानेवर ठेवून १८० बैठका मारल्या.या गोटीचे पूजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, गणेश ढोरे,भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उमेश ढोरे, उपनगराध्यक्ष राहूल ढोरे ,बाबुराव वायकर, पंढरीनाथ ढोरे, तुकाराम ढोरे, अशोक बाफना, सुनीता कुडे,विठ्ठलराव भोसले, बिहारीलाल दुबे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सुनील चव्हाण,बापू वाघवले, आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.बैठका मारलेले स्पर्धक पुढीलप्रमाणे----
नितीन म्हाळसकर १८०, चिराग वाघवले १०१, मदन भिलारे ७०,अनुप जाधव ५०, गोकुळ काकडे ४३, रूषीकेश चव्हाण ४१, बाबा सुर्वे ३५, अमर निमजे ३२ तर सुरेंद भिलारे याने सर्वात मोठी गोटी उचलून ३० बैठका मारल्या. याशिवाय अनेकांनी गोटी उचलून फेकण्यामध्ये भाग घेतला. जयबजरंग तालीम मंडळाचे वस्ताद उमेश ढोरे व सदस्यांच्या वतीने उत्कृष्ट खेळाडूंना स्वर्गीय पै. केशवराव ढोरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामस्थानच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.
नितीन म्हाळसकर ठरला किंगमेकर..
आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धत नितीन म्हाळसकर याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. तळेगाव येथील इंद्रायणी कॉलेजमधील जीममध्ये कोच म्हणून काम पाहात आहे. त्यांना तीन मुले असूनदेखील १८० बैठका मारून सर्वांचे रेकार्डॅ तोडले.या पूर्वी सुरेंद भिलारे यांनी १६० , चिराग वाघवले यांनी १३२ बैठका मारल्या होत्या.तर नितीन म्हाळसकर यांनी १८० बैठका मारून या वयात चांगलीच कामगिरी करत रेर्कार्ड तोडले.