लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी राजकारणविरहित एकोप्याने कामकाज करणे देशाच्या हिताचे ठरेल. ही वेळ उणीधुनी काढण्याची आणि राजकारण करण्याची नाही. जनतेच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
दौंड येथे तहसील कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत खासदार सुळे यांनी घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण आणि नियोजनात्मक कामकाज संपूर्ण भारतात एकमेव महाराष्ट्रात झाले असून याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयासह केंद्र सरकारने दिला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या कामकाजात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोरोनाचे संकट भयानक आहे याकडे शासकीय अधिकारी, नागरिक, सेवाभावी संस्था आणि राजकीय संघटनांनी गांभीर्याने घेऊन जनतेच्या हितासाठी शासनाचे नियम पाळून कामकाज करा, असे शेवटी सुळे म्हणाल्या.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार सचिन आखाडे, गटविकास आधिकारी आजिंक्य येळे, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, सारिका पानसरे उपस्थित होते. या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या कामकाजाबाबत जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, बादशाह शेख, आबा वाघमारे, प्रशांत धनवे यांनी नाराजी व्यक्त करून डॉ. डांगे यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली. यावेळी डॉ. संग्राम डांगे म्हणाले की, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.
अजितदादांचा पूर्ण चेहरा कोणी पाहिला का ?
कोरोना आढावा बैठकीत सुप्रिया सुळे जाहीर भाषणात म्हणाल्या की, दोन वर्षांत कोरोना संकटात अजितदादांचा पूर्ण चेहरा कोणी पाहिला का? नसेल पाहिला कारण सुरक्षिततेसाठी त्यांनी दिवसभरात तोंडावरचा मास्क काढला नाही. अजितदादांच्या इतर कामकाजाचे अनुकरण केले जाते. मग तोंडाला मास्क वापरण्याचे अनुकरण का केले जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.