लोणी काळभोर : एमपीएससीची परीक्षा देऊन देशसेवेसाठी तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. तरुणासोबत चौघेजण कुंजीरवाडी येथे मित्राच्या लग्नाला गेले होते. त्याठिकाणी हॉटेलमधून थंडपेय घेऊन पुन्हा कार्यालयात जाताना पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात घडला. यामध्ये एक जण जागीच मृत्यूमुखी पडला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत्युमुखी पडलेला तरूण एमपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करण्याच्या तयारीत होता. परंतु त्याची ही इच्छा अधुरी राहीली आहे.
या अपघातात अजिंक्य मोहन सागळे (वय- २६ रा. सिंहगड रोड, पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मित्र मोहित मधुकर घोलप (वय २५ रा. विद्याविहार कॉलनी, डीपी रोड, माळवाडी, हडपसर) गंभीर जखमी झाला आहे. धीरज शिवाजी काळे (वय २८ रा- लेन नं २, विद्याविहार कॉलनी, डीपी रोड, माळवाडी, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कंटेनर चालक गंगाधर रेवणय्या स्वामी (वय २२, रा. घाटबोरल, ता. होमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी मित्राचा विवाह कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कला गोविंद सागरकार्यालय येथे असल्याने फिर्यादीसह आशिष उबाळे, मोहित घोलप, अजिंक्य सांगळे हे लग्नासाठी आले होते. दुपारच्या वेळी हे चौघे कार्यालयाचे समोर असलेल्या मराठमोळा हॉटेलमध्ये थंडपेय पिण्यासाठी आले होते. सदर ठिकाणी थंडपेय पिऊन ते पुणे सोलापुर महामार्ग ओलांडून पुन्हा लग्नाचे ठिकाणी कार्यालयांत पायी चालत जात होते. दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारांस पुण्याकडुन सोलापुरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने मोहित घोलप व अजिंक्य सांगळे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते दोघे रस्त्यावर खाली पडले. त्यावेळी अजिंक्यच्या शरीराची संपुर्ण हालचाल थांबलेली होती. तर मोहित घोलप याचा श्वासोच्छवास चालु असल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी स्टेशन येथे येथे आणले. तेथील डॉक्टरांनी अजिंक्य सांगळे याची तपासणी करून तो उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. तर मोहित घोलप हा गंभीर जखमी असल्याने सध्या त्यांच्यावर उपचार चालु आहेत. अजिंक्य सांगळे हे बिडीएस डॉक्टर असून ते सध्या एमपीएससी परीक्षा देवून देशसेवा करण्याच्या तयारीत होते. परंतू त्याची ही इच्छा अधुरी राहीली आहे.