पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खासगी चारचाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून एक युवक फिरत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. सासवड पोलिसांनी या महाभागाला ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याच्या कारवरून लोगोही हटवला आहे. त्यामुळे सासवड शहरात ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ अशी उपरोधिक चर्चा रंगली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात एक कार गोलाकार हिरव्या रंगाचा स्टिकर लावून फिरत होती. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोकस्तंभ असा हिरव्या रंगाचा स्टिकर कारच्या समोरील बाजूस चिकटवलेला दिसून आला. पोलिसांनी त्या कारचा पाठलागही केला होता. परंतु, ती कार सापडली नव्हती. मात्र, शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आमदारकीचा बॅनर लावलेली क्रेटा कार दिसली. त्या कारवर अशाच प्रकारचा स्टिकर लावलेला होता. कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली.
यावेळी कारमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते किंवा ही कार आमदार महोदयांच्या मालकीचीही नाही. कारचे मालक ऋतुराज गायकवाड (रा. काळेवाडी) असल्याचे त्यामधून समोर आले. त्याचबरोबर या क्रेटा कारला फॅन्सी नंबरप्लेट तसेच कारला ब्लॅक फिल्मिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता. पोलिसांनी ही कार पोलिस ठाण्यात आणून कारला लावलेला लोगो जप्त केला. या सोबतच मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६ हजार ५०० रुपये दंड केला.