पुणे : सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, परिवर्तन मिश्र विवाह चळवळीचे अग्रणी, समता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वंचित समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास वाघ यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. ते ८३ वर्षांचे होते. कात्रज येथील स्मशानभूमीत दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी उषा वाघ आहेत.
सिद्धार्थ सहकारी बँकेचे दोन वर्षे तसेच राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष ते अध्यक्ष होते. वाघ यांनी पुरोगामी विचारांसाठी ‘सुगावा’ नियतकालिक सुरू केले. सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शक ठरू शकतील, अशी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली. भुकूम येथे वंचित कुटुंबांना घेऊन त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या समाज प्रबोधन कार्यकर्ता आणि पुणे विद्यापीठाच्या जीवन साधना गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सुगावा मासिकाला २००३ सालचा ‘इंटरनॅशनल मिशन कॅनडा’ हा पुरस्कार मिळाला होता.
अल्प परिचय
१ मार्च १९३९ रोजी धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे विलास वाघ यांचा जन्म झाला. धुळ्यात माध्यमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले. स. प. महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. १९६२ मध्ये कोकणातील नरडवणे गावात शिक्षक म्हणून ते रुजू झाले. पुढे १९८० पर्यंत ते पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षणशास्त्र (बी.एड) शाखेची पदवी मिळवून ते तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण विभागात नोकरीला लागले. १९८३ मध्ये त्यांनी उषा यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. परिवर्तन मिश्र विवाह संस्था सुरू करून आंतरजातीय विवाहाच्या चळवळीसाठी त्यांनी वाहून घेतले. वडारवाडीतील मुलांसाठी बालवाडी, सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह, समता वसतिगृह, तळेगाव आणि मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा, मोराणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, असे मोठे शैक्षणिक काम त्यांनी उभे केले.
चौकट
पुरस्कार
-६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार
- दलित साहित्य अकादमीतर्फे (नवी दिल्ली) डॉ. आंबेडकर फेलोशिप
- दलित मुक्त विद्यापीठातर्फे (गुंटूर, आंध्र प्रदेश) डॉ. आंबेडकर फेलोशिप
- महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार
- आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार
- प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार
- समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार
- दादासाहेब रूपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार
- पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालकपदी नेमणूक
- दया पवार स्मृती पुरस्कार
- पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार
चौकट
पुस्तकांचे लेखन, संपादन, अनुवाद
-आंबेडकरी भावनांचा विध्वंस
-बौद्ध धर्मात शिक्षेची संकल्पना
-बौद्ध धम्माचे आचरण कसे करावे?
-तंट्या भिल्ल