लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोद्रे क्रिकेट मैदानावर बारा वर्षांखालील मुलांसाठी खेळल्या गेलेल्या एके लिटर मास्टर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीवायसी क्लब क्रिकेट संघाने २२ यार्ड्सवर मात केली. स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले होते.
२२ यार्ड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ९ बाद ९६ असी धावसंख्या उभारली. पीवायसीच्या संघाने हे आव्हान अवघ्या १८ षटकांमध्ये ९ गडी राखून सहज पार केले. पाच षटकात फक्त १२ धावा देऊन तीन गडी टिपणारा पीवायसीचा अदित डोंगरे सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेत तीन डावांमध्ये सर्वाधिक २१४ धावा ठोकणारा पीवायसीच्या सचल सिंगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. पीवायसीकडून साई बोऱ्हाडे (१२३ धावा), ह्रषिकेश देऊसकर (६२ धावा) अदित डोंगरे (७ बळी) आणि इशान भालेराव (६ बळी) यांनीही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.