पुणे : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने (बालभारती) तयार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र बालभारतीच्या विषय समिती व अभ्यास मंडळांमधील बहुतांश सदस्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर हे साहित्य तयार करण्यात आल्याच्या तक्रारी अभ्यास मंडळांच्या सदस्यांनी केल्या आहेत.बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, अनेक दिवसांपासून तो कार्यान्वितच नव्हता. अखेर २ जुलै रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या क्यूआर कोडच्या सॉफ्टवेअरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिक्षा अॅपच्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध होणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी प्रत्येक विषयनिहाय एक विषय समिती व एक विषय अभ्यास गट असतो. विषय समितीमध्ये ५ ते १० तर अभ्यास गटामध्ये २५ ते ३० सदस्य असतात. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामामध्ये विषय समितीमधील सदस्य कोअर गट म्हणून काम करीत असतो तर अभ्यास गटातील सदस्य त्यांना मदत करीत असतात. पाठ्यपुस्तकांची अंतिम जबाबदारी त्यांच्यावर असते. या पाठ्यपुस्तकांशी संबंधित ई साहित्य तयार करून ते विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकारचे हे साहित्य बनविण्यात आले आहे याची माहिती अभ्यास मंडळांमधील बहुतांश सदस्यांना देण्यात आली नाही. याबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अभ्यास मंडळांच्या सदस्यांना विश्वासात घेतले गेले असते, तर अधिक योग्य ठरले असते. काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दुरूस्त करता येऊ शकल्या असत्या, असे मत अभ्यास मंडळांच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.काय आहे क्यूआर कोडराज्य मंडळाच्या पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या सर्व पाठ्यपुस्तकांमधील प्रत्येक पाठाच्या शेवटी एक क्यूआर कोड दिला आहे. हा कोड मोबाइल, टॅब याद्वारे स्कॅन केल्यास संबंधित पाठाशी संबंधित संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स उपलब्ध होणार आहेत.
मंडळांना विश्वासात न घेताच क्यूआर कोड; समिती सदस्यांनी व्यक्त केली नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:46 PM