निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गगनयान हा भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे. बूस्टर उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहे. केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला असून, अशी क्षमता असणारी वालचंदनगर कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. २०२० मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहे. मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. बूस्टर बनविण्याबरोबरच बूस्टरची क्षमता तपासण्याचा प्रकल्पही कंपनीत उभारला आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उदघाटन १८ डिसेंबरला कंपनीच्या आवारात होणार आहे.
----
गगनयानासह भविष्यातील मोहिमांचा वाचणार वेळ
प्रक्षेपकाच्या बूस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिउच्च ज्वलनशील असे इंधन असते. हे इंधन साठवण्याची ताकद या बुस्टरमध्ये असावे लागते. पूर्वी हे बुस्टर कंपनीत तयार झाल्यावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) तपासणी केंद्राकडे पाठविले जात होते. त्या ठिकाणी चाचण्या यशस्वी झाल्यावरच प्रक्षेपणासाठी हे बूस्टर वापरले जात होते. एखादा दोष आढळल्यास कंपनीचे तंत्रज्ञ त्या ठिकाणी जाऊन तो दूर करत होते. यात बराच वेळ जात होता. मात्र, या नव्या प्रकल्पामुळे हा वेळ आता वाचणार आहे.
---
अशी होणार गुणवत्ता चाचणी
प्रक्षेपकाला लागणारे बुस्टरचा व्यास हा ९ मीटर असतो. हे बूस्टर प्रक्षेपकासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी बूस्टरमध्ये नव्या यंत्रणेच्या साह्याने द्रवरूप पदार्थ टाकून त्यात हवेचा दबाव निर्माण केला जातो. यासाठी चार मजली उंच असलेली यंत्रणा बांधण्यात आली आहे. बूस्टरचे सर्व सुटे भाग एकत्र करून त्यांची दबाव सहन करण्याची क्षमता तपासली जाते. यात काही त्रुटी आढळल्यास संगणकाच्या आणि प्रत्यक्ष तंत्रज्ञाच्या साह्याने त्या दूर केल्या जातात.
चौकट
क्र्यू एस्केप सिस्टिमही करणार तयार
गगनयान मोहिमेच्या प्रक्षेप यादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचवण्यासाठी क्र्यू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करत आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
----------
चंद्रयान मोहिमेतही महत्वाची भूमिका आम्ही पार पाडली होती. बूस्टर गुणवत्ता चाचणी प्रकल्पाबाबत इस्रोने मागणी केली होती. त्यानुसार केवळ दीड वर्षात आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पामुळे वेळेत बूस्टरची गुणवत्ता तपासता येणार आहे. यामुळे अंतराळ मोहिमेतील अपघात टाळता येणार आहे.
-चिराग दोषी, व्यवस्थापकीय संचालक वालचंदनगर इंडस्ट्रीज
--------
फोटोओळ :
भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प गगनयानाच्या बूस्टर प्रकल्पाची पूर्वतयारी वालचंदनगर कंपनीत सुरू असताना.