पुणे : उत्साह टिकवून ठेवत चित्रपट उद्योगात कायमच सर्जनशील आणि दर्जात्मक काम करायला हवे, अशी अपेक्षा एफटीआयआयचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आर. माधवन यांनी व्यक्त केली. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आर. माधवन हे पहिल्यांदाच फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)मध्ये आले अन् दोन दिवसांच्या भेटीत त्यांनी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेण्यासह गुरुवारी स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चाही केली. अध्यक्षांच्या येण्याने कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
याशिवाय आर. माधवन यांनी विभाग प्रमुख आणि एफटीआयआय कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचीही भेट घेतली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी ओपन लर्निंग वर्टिकल, सेंटर फॉर ओपन लर्निंगअंतर्गत ४५०हून अधिक शॉर्ट कोर्स यशस्वीपणे घेतल्याबद्दल एफटीआयआय प्रशासनाचे कौतुकही केले. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी भारतभर विनाशुल्क छोटे अभ्यासक्रम घेतले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे प्रश्न साेडवण्याची ग्वाही
पायाभूत सुविधांसह शैक्षणिक प्रश्नांबाबत आर. माधवन यांनी आमच्याशी चर्चा केली. एफटीआयआयमधील विविध गोष्टींमध्ये कायम सहभाग असावा, त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले, एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.