बारामतीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरुन नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 05:29 PM2020-11-11T17:29:32+5:302020-11-11T18:23:14+5:30
भाजपचे सरकार असताना देखील दरवर्षी हे सानुग्रह अनुदान मिळाले आहे .मात्र आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असून व पालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे.
बारामती : बारामती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देण्यात येते . मागील वर्षी २० हजार रुपये अनुदान दिले होते. यंदा कोरोना संसर्गाच्या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ हजार सानुग्रह अनुदान मिळण्याची मागणी केली आहे. त्याला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी हिरवा कंदिल दाखविला. मंगळवारी (दि १०) पालिकेत याबाबत बैठक पार पडली. यावेळी मात्र सानुग्रह अनुदान देण्याच्या विषयावरुन घुमजाव करत या विषयावर मार्ग काढू अशी भूमिका घेण्यात आली. त्या विषयावरुन सत्ताधारी नगरसेवक यांच्यात जोरदार हमारीतुमरी झाल्याची चर्चा आहे.
नगर पालिकेत झालेल्या सानुग्रह अनुदानाच्या बैठकीत मोठ्या संख्येने
कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.मागील वर्षी वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. ते यंदा पंचवीस हजार रुपये मिळावे या मागणीला नगराध्यक्षांनी होकार देखील दिला होता .मात्र काल संध्याकाळी पालिकेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी ,नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही काहीतरी मार्ग काढतो असा सूर आळवला.त्यामुळे पालिकेचे कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार काय अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पालिकेतील ३०० कर्मचाऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. मात्र याबाबत विचार
करू असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी दिवाळी दोन दिवसांवर असल्याने सहाय्यक अनुदान जमा असून त्यातून सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तर पुढील महिन्यात पगार उशिरा द्यावा, अशी कर्मचाऱ्यांनी विनवणी केली. तर यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या वतीने पालिकेचा ठराव करुन पैसे देण्याची तयारी दाखवली.त्यानंतर देखील हे पदाधिकारी बघू काही तरी मार्ग काढू ,असे आश्वासन देण्यात धन्यता मानत असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे सर्व कर्मचारी हवालदील झाले आहेत.
मागील काळात भाजपचे सरकार असताना देखील दरवर्षी हे सानुग्रह अनुदान मिळाले आहे .मात्र आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असून व पालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. यावेळी सफाई कर्मचारी ,पाणीपुरवठा ,उद्यानविभाग ,शिपाई यांनी कोरोना संसर्गाच्या काळात दिवस रात्र काम केले आहे. त्यांना तरी त्वरित सानुग्रह अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी. बाकी कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी द्या,अशी तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शविली आहे.यावर देखील सत्ताधारी काही निर्णय देत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.स्थानिक राजकारणात कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का,असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, या बैठकीवेळी काही सत्ताधारी नगरसेवकांनी अप्रत्यक्ष विरोध केल्याने सानुग्रह अनुदान विषय लांबला.यावरुनच नगरसेवकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाल्याचे समजले.तर याविषयावर कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून उद्या भेटणार असून त्यांना निवेदन देणार असल्याचे समजले.
——————————————
पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीवावर उदार होऊन रात्रंदिवस प्रामाणिक पणे काम केले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे
— नगरसेवक गणेश सोनवणे.
————————————————————
कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे .मात्र सध्या पालिकेचा नफा फंड अडचणीत असल्याने तसेच कोरोना संसर्गाच्या काळात पालिकेचे उत्पन्न कमी आहे.यावर काही तरतूद करून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार
पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष
——————————————————
मी मुंबई येथे आहे .याबाबत काही बोलू शकत नाही.
- किरणराज यादव; मुख्याधिकारी
————————————