पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत 'राजकारण' तापले; वेल्हा पंचायत समितीच्या इमारतीवरून जोरदार खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:56 PM2021-05-31T20:56:07+5:302021-05-31T20:59:46+5:30

जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि काँग्रेस सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Quarrel between Pune Zilla Parishad online meeting frome Velha Panchayat Samiti building issue | पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत 'राजकारण' तापले; वेल्हा पंचायत समितीच्या इमारतीवरून जोरदार खडाजंगी

पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत 'राजकारण' तापले; वेल्हा पंचायत समितीच्या इमारतीवरून जोरदार खडाजंगी

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस सदस्यांनी सभात्याग करत राजीनामा देण्याचा दिला इशारा

पुणे : वेल्हे पंचायत समितीच्या इमारतीबाबत गेल्या वर्षभरापासून ठराव करण्याची मागणी करत आहोत. आतापर्यंत चार सभा झाल्या. मात्र, वेल्हे पंचायत समिती इमारतीबाबत अद्यापही तारीख पे तारीख सुरू आहे. आम्ही मोठ्या उदार मनाने यांना मदत केली. मात्र, आमची मुद्दाम अडवणूक केली जात आहे. आतापर्यंत आम्ही सहन केले. मात्र, आता सहन करणार नाही. जर इमारतीचा ठरवा होत नसेल तर अशा सभागृहात राहून तसेच सदस्य राहून काय फायदा ? असे म्हणत कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना धारेवर धरले. यावर उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी उत्तर देत तुमची खासदारांच्या बैठकीत येण्याची तयारी नसते असा आक्रमक पावित्रा घेतला. यावरून उपाध्यक्ष आणि सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. कॉंग्रेसच्या संतप्त सदस्यांनी राजीनामा देण्याचा इशारा देत सभात्याग केला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी ऑनलाईन पार पडली. या बैठकीला अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, देविदास दरेकर तसेच सदस्य उपस्थित होते.

काँग्रेसचे सदस्य अमोल नलावडे यांनी वेल्हे पंचायत समितीच्या इमारतीचा मुद्दा उपस्थित करत ठराव कधी घेणार, अशी मागणी केली. जागा असताना तसेच तसा ठराव झाला असताना अद्यापही जिल्हा परिषदेने मंजुरी दिली नाही, यामुळे ते आक्रमक झाले. आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पाठिंबा दिला. इतरही विषयात महाविकास आघाडीचा घटक म्हूणन आम्ही सोबत असतो. मग आमच्या हक्काच्या इमारतीच्या प्रश्नावर आमची अडवणूक का, असे म्हणत अमोल नलावडे व कॉंग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. या वेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरेही आक्रमक झाल्याने कॉंग्रेस सदस्य आणि शिवतरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. शिवतरे म्हणाले की, आम्ही वारंवार बैठका घेतल्या. खासदारांसोबतही आम्ही बैठकीचे नियोजन केले. मात्र, तुम्हाला त्यांच्या सोबत बसायचे नसते.

यावर अमोल नलावडे म्हणाले की, आम्ही या संदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी मंजुरी दिली असतानाही ठराव का होत नाही, असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या सर्वसाधारण सभेतही याच मुद्यावरून काँग्रेस गटनेत्यांनी सभात्याग केला होता. याही बैठकीत जर आमची मागणी मान्य होत नसेल, सदस्यांचे प्रश्न सुटत नसतीत त्या सभागृहात राहून काय उपयोग, असे म्हणत काँग्रेसच्या सर्वांनी सभात्याग केला.

Web Title: Quarrel between Pune Zilla Parishad online meeting frome Velha Panchayat Samiti building issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.