पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत, त्याचीच पुनरावृत्ती करीत, पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. तर या प्रस्तावाला मंजुरी देणारे राष्ट्रवादीचे सदस्य पण एजंट का असा पलटवार भाजपने केला आहे. पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी पालिकेचा मालकीचा फ्लॅट ची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रस्तावावर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पत्रकार परिषदेत म्हणाले, "२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या १२६० फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव हा त्यातीलच एक भाग आहे. फ्लॅट विक्रीचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो केवळ २०० कोटी रुपयांचा नाही. तर, या फ्लॅटची किंमत सुमारे २२०० कोटींच्या घरात आहे. हे फ्लॅट ज्या भागात आहेत, ज्या स्कीममधील आहेत, त्याची यादी पाहिल्यास आपल्याला ते लक्षात येईल. त्यामुळे, गरिबांना फ्लॅट देण्याच्या आडून सत्ताधारी भाजपचा हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे. पुणेकरांची फसवणूक करण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही."
"रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेले महानगरपालिकेच्या मालकीचे फ्लॅट त्यांनाच विकण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १२६० आणि दुसऱ्या टप्प्यात ७२४ अशा १९८४ फ्लॅटची विक्री करण्यात येणार आहे. हा निर्णय घेतला जात असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही. घाईगडबडीत हा निर्णय घेतला गेला. यामागे मोठा भ्रष्टाचार असून, गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करीत आहेत. तर, कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यता आहे. हा जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे. आम्ही याबाबत नगरविकास खाते, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करणार आहोत."असेही जगताप म्हणाले
पालिकेवर इतकी वाईट वेळ आली नाही असं म्हणत पुणे महानगरपालिकेच्या सुमारे २२०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काटकसर करून या ठेवी जमा केल्या आहेत. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता, पालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी विकून विकासकामे करावेत, इतकी वाईट वेळ पालिकेवर आली नाही. जर गरज पडलीच, तर या ठेवींतून किंवा ठेवींवर कर्ज घेऊन विकासकामे करण्यास आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, बापाने कमवायचे आणि पोराने गमवायचे, याप्रकारे पालिकेच्या प्रॉपर्टींची विक्री करण्यास आमचा विरोध आहे.
प्रशांत जगताप यांना सभागृह नेते बिडकर यांचं उत्तर....महापालिकेने भाडेतत्वावर दिलेले फ्लॅट संबधित भाडेकरु यांना विकत देण्याचा ठराव शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्य करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता देणारे या समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद यांच्यासह विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ या देखील 'इस्टेट एजंट' आहेत का? हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर करावे, असे आव्हान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिले आहे.
शहराध्यक्षपदाची नव्याने जबाबदारी मिळाल्याने काहीतरी खळबळजनक करावे, या हेतूने सध्या प्रशांत जगताप हे मनाला वाटेल तशी व्यक्तव्य करत आहेत. पालिकेतील प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने अवघ्या एका महिन्यांमध्येच त्यांच्याच पक्षाचे सभासद त्यांच्या या कारभारामुळे त्रस्त झालेले आहेत.
पालिकेच्या इमारतींमध्ये वर्षानुवर्ष भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने संबंधित भाडेकरूंच्या नावावर ही घरे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एकही मोकळी सदनिका विक्री केली जाणार नाही. प्रशासनाने ठेवलेला हा प्रस्ताव नागरिकांच्या हिताचा असल्यामुळेच शहर सुधारणा समितीसह स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला एक मताने मंजुरी देण्यात आली आहे. जगताप यांचा त्यांच्याच पक्षाच्या सभासदांवर विश्वास दिसत नसल्यानेच ते अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करत असल्याचे बिडकर यांनी सांगितले.
या दोन्ही समितीमध्ये सभासद असलेल्या माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नंदा लोणकर, बंडू गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांना या प्रस्तावाची माहिती होती. यापैकी एकाही सभासदाने समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध दर्शविला नाही. दोन्ही समित्यांमध्ये हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप हे सत्ताधारी पदाधिकारी पालिकेच्या जागा विकत असून इस्टेट एजंट झाले असल्याचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देणारे राष्ट्रवादीचे सभासद देखील इस्टेट एजंट आहेत का? अशी विचारणा सभागृह नेते बिडकर यांनी केली आहे.