पुणे : शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असून येत्या महिन्याभरात आजवरच्या सर्व कामांचा चौकशी आणि तपासणी अहवाल सादर करण्याचे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडले. स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला दिलेल्या ३० कोटींच्या 'पेमेंट'च्या मुद्द्यावरून या बैठकीचे वातावरण चांगलेच तापले. सल्लागाराला कोट्यवधी मोजता आणि कामे कसली करता? असा सवाल करत पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले. यावेळी खासदार गिरीश बापट आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी देखील झाली.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी सादरीकरणाद्वारे कामांची माहिती दिली. स्मार्ट सिटी मिळालेल्या ६०० कोटी रुपायांपैकी ४२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या मुद्द्यावरून उपस्थित आमदारांनी खर्चाच्या तपशिलाची माहिती मागितली. हा तपशील दिला जात असतानाच 'सल्लागारा'वर स्मार्ट सिटीने ३० कोटी खर्च केल्याच्या मुद्द्यावरून आमदारांनी कामाच्या दर्जासह प्रलंबित कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी पवार यांनी सल्लागार काय दिवे लावतात, सब-कन्सल्टंट नेमून कामे केली जात आहेत. तसेच स्मार्ट सिटीने उभारलेल्या इमारतींपासून, त्यांच्या रंगांपर्यंतच्या कामाचे वाभाडे काढत अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटीच्या सर्व कामांच्या चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
कामांचे 'सीओईपी'कडून ऑडिट करून त्याचा अहवाल पुढील महिन्याच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी खासदार बापट यांनी स्मार्ट कामांवरून प्रशासनाला धारेवर धरल्यावर विभागीय आयुक्त राव यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली.
=====
स्मार्ट सिटीकडून पीएमपीएमएलला ३ कोटी रुपये देण्याच्या मुद्द्यावरूनही पवार यांनी स्मार्टच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.