पुणे : पुणेरी पाट्या या जगभरातील नागरिकांचा चर्चेचा विषय अाहे. मार्मिक शब्दांमधून तिरकसपणे टाेलेबाजी पुणेरी पाट्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पुणेकरांचे स्वभाव वैशिष्ट्य सांगणाऱ्या या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन लाेकमतने काेथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात भरविले हाेते. या प्रदर्शनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी संध्याकाळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी ताेबा गर्दी केली हाेती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र हाेते.
लाेकमत तर्फे 23 व 24 जून राेजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन अायाेजित केले हाेते. ''पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पहिल्या मजल्यावर अाहे इथे कुठेही चाैकशी करु नये'' या प्रवेशद्वारावरील पाटी वाचल्यानंतर अातमधील प्रदर्शनात भन्नाट पाट्या वाचायला मिळणार याची अनुभूती रसिकांना येत हाेती. ''अाम्ही चुना फक्त अामच्या पानाला लावताे दुसऱ्यांना लावायचा चुना अाम्ही विकत नाही'', ''बिगर बर्फ रस घेतल्यानंतर बर्फ मिळणार नाही'', ''हे हाॅस्पिटल वेड्यांकरिता असले तरी येथे काम करणारे मात्र शहाणेच अाहेत'', ''येथे हापूसचे भाव फिक्स अाहेत, घासाघासी करु नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल'' अश्या असंख्य पाट्या या प्रदर्शनात मांडण्यात अाल्या हाेत्या. प्रत्येक पाटी वाचल्यांतर पुणेकर भरभरुन दाद देत हाेते. अनेकजण या पाट्यांचे फाेटाे अापल्या माेबाईलमध्ये टिपत हाेते तर काहींनी थेट या पाट्यांसाेबत अापले सेल्फी काढून घेतले.