पुणे : कोरोना विषाणूमुळे लागू झालेल्या संचारबंदीचा फटका शहरातील गोठे धारकांना बसत होता. परंतू, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे शहरातील ८५० गोठ्यांमधील साडेपाच हजार जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कोरोनाची दहशत यंत्रणांनी घेतलेली असून आरोग्य सुविधांसह जे जे शक्य आहे; त्या सर्व उपाययोजना शासन स्तरावर सुरु आहेत. शहरातील गोठ्यांमधील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गोठ्यातील जनावरांच्या खाद्याचे काय करायचे असा प्रश्न गोठे चालक-मालक यांच्यासमोर होता.
शहरात आजमितीस ८५० गोठे आहेत. महापालिकेच्या धोरणानुसार आतापर्यंत ५०० च्यावर गोठे मुंढवा आणि काही उपनगरांमध्ये हलविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत आणखी ४०० गोठे शहरामध्ये असून यामध्ये उपनगरे आणि समाविष्ठ गावांचाही समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातही अनेक ठिकाणी गोठे आहेत. सहकारनगर, बिबवेवाडी, लष्कर परिसर, कोथरुड, सिंहगड रस्ता आदी ठिकाणी असलेल्या सर्व गोठ्यांमध्ये जवळपास साडेपाचशे जनावरे असून गायी, म्हैस अशा दुभत्या जनावरांचा समावेश आहे. काही प्रमाणात बैल आणि रेडेही आहेत. पशूखाद्याची दुकाने बंद राहिली तर जनावरांचे कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच वाहतूक बंद असल्याने जनावरांना लागणारा चारा, कडबा-कुट्टी आणि वाडा कसा आणायचा असाही प्रश्न निर्माण झाला होता.
परंतू, शासन आणि जिल्हा प्रशासनाने शेती संबंधित आणि पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गोठे धारकांना दिलासा मिळाला. शहरातील पशूखाद्य दुकानांमध्ये पशूखाद्य पुरेसे उपलब्ध होत असून चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मिटला आहे. जिल्ह्यामधून चाऱ्याच्या गाड्या शहरात येऊ देण्यास पोलीस परवानगी देत आहेत. गाड्या अडविल्यास पोलिसांना चा-याच्या गाड्या असल्याचे सांगितल्यास पोलिसही सहकार्य करीत असून चाऱ्याच्या गाड्या सोडल्या जातात असे गोठा मालक अर्जून जानगवळी यांनी सांगितले.