पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत इंदापूरमधील जागा राष्ट्रवादी की काँग्रेस हा वादा उफाळून आला. त्यावेळी, शिवस्वराज्य यात्रेतील प्रमुख चेहरा असलेल्या खासदार अमोल कोल्हेंनी थेट राजीनाम्याची भाषा केली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील केवळ एक मावळा आहे. जर, पवारसाहेबांनी सांगितलं तर मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल, असे म्हणत इंदापूरमधील जागेचा वाद मी सोडवू शकत नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेली जुगलबंदी अद्याप सुरूच आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवरून स्वपक्षाकडून डावलल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरच्या जागेवर ठाम असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, राष्ट्रवादी काँग्रेसच शिवस्वराज्य यात्रा आज इंदापूरमध्ये पोहोचली. त्यानंतर, येथे चांगलेच राजकीय नाट्य पाहायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नियोजित दौऱ्याप्रमाणे आज इंदापुरात पोहचली. इंदापुरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. ही जागा दोन्ही पक्षाला आपल्याकडे हवी आहे. त्यावरून सभेत एका कार्यकर्तेयानं दत्ता भरणेंचं तिकीट फिक्स करा, असा आवाज उठवला. त्यावेळी, व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे बोलत होते. त्यांनी तात्काळ या कार्यकर्त्याला उत्तर दिलं. मी तिकीट फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे. खासदारकीचा, सत्तेचा मला मोह नाही. उद्या पवार साहेबांनी राजीनामा दे, असं सांगितलं. तर दुसऱ्या क्षणाला मी खासदारकीचा राजीनामा देईल, असेही कोल्हे यांनी भरसभेत म्हटलं. तसेच, दत्ता मामांचं तिकीट फिक्स की नाही मी सांगणार नाही. पण, येणाऱ्या विधानसभेला भाजप शिवसेना पुन्हा नाही, तर यंदा शिवस्वराज्य येणार असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.
जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडूनही मोठा धक्का बसला आहे. पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी चर्चेत असलेल्या अंकिता पाटील यांच्या नावाचा पत्ता कापत ऐनवेळी दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यातच आता शिवस्वराज्य यात्रेचं इंदापूरममध्ये आयोजन करून राष्ट्रवादीनेही पाटील यांना धक्का दिला आहे. एकूणच काँग्रेससह राष्ट्रवादीकडूनही धक्के बसत असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी इंदापूरची जागा आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. तर, काँग्रेसचे मोठे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा ही जागा कोणाकडे जाणार? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.