पुणे : ‘‘आपला देश सूर्य प्रकाशाने समृद्ध असूनही आपण सौरऊर्जेचा वापर न करता सूर्याची पूजा केली पाहिजे असे मानतो. प्रश्नविचारले किंवा हातात घेतले की, राष्ट्रद्रोही समजले जाते. वास्तव आणि सत्य परखडपणे स्वीकारण्याची वेळ आली असून, आपल्या समाजातील हा अशिक्षितपणा मोडण्याची आता गरज आहे,’’ असे मत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केले.
कै. ग. वा. जोशी तथा सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा ही संस्था यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०)वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोहर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सभेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कोशाध्यक सुरेश कालेकर, भारत साबळे, शरद गर्भे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ३ हजार १ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. संस्थेच्या ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
विद्याधरपंत नारगोलकर म्हणाले, पुणे सार्वजनिक सभेच्या यंदाच्या १५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रा. के. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अरविंद नवरे यांनी आभार मानले. या वेळी पुरस्कारार्थिंनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारामुळे बळ मिळते, अशी भावना व्यक्त केली.अंतर्गत यंत्रणा स्वच्छ झाली तर भारत स्वच्छ१ मुक्ता मनोहर म्हणाल्या, एकीकडे तंत्रज्ञान पुढारत आहे आणि दुसरीकडे बारा ते पंधरा फूट गटारात उतरून आजही कामगार स्वच्छता करीत आहेत. या व्यवसायावर आजही जुन्या विचारांचा पगडा कायम दिसतो. स्वच्छतेची अंतर्गत यंत्रणा कशी स्वच्छ ठेवता येईल, याचा विचार प्रत्येक जण करेल तेव्हा भारत स्वच्छ होत आहे, असे म्हणता येईल.२ स्त्रीला एक स्वतंत्र अस्मिता आहे तिला स्वतंत्र ओळख आहे हे आपण कधी ओळखणार आहोत, असा प्रश्न रेणू गावस्कर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, व्यक्तीला समाजातील स्थानावरून नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वावरून ओळखायला शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांनाही शिकविले पाहिजे. टाळ््या वाजविणारे हात जेव्हा समाजिक जबाबदारीचे काम करायला लागतील तेव्हा बदल घडेल.