लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : येथील कुरकुंभ-दौंड रस्त्यादरम्यान असणाऱ्या घाटात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्या हा खोडसाळपणा करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतजमिनी, माळरान, डोंगराळ भागातदेखील याचा परिणाम प्रभावीपणे दिसून येत आहे. कुरकुंभ घाटातील ज्या ठिकाणी हे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले त्या ठिकाणीच कुरकुंभ येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईनदेखील आहे. ती सध्या बंद आहे. कुरकुंभ गावातील सर्वच जमिनी या दूषित पाण्यामुळे खराब झाल्या असून, या कंपनीच्या मालकांनी आता माळरानावरदेखील याचा प्रयोग सुरु केलाय का? हा प्रश्न सध्या येथील रहिवाशांना पडला आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे व्यवस्थापन रासायनिक सांडपाण्याचा खर्च टाळण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीररीत्या रात्री-बेरात्री कुरकुंभ व परिसरात रासायनिक प्रक्रिया झालेले सांडपाणी गुपचुपपणे सोडून देऊन पर्यावरणाचा परिणामी येथील लोकवस्तीचा ऱ्हास करीत आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटे वारंवार जागा बदलून वेगवेगळ्या ठिकाणी रासायनिक सांडपाणी सोडून देत असल्याची उदाहरणे या ठिकाणी घडत आहेत, तर सामान्य नागरिक व ग्रामस्थ याकडे फक्त बघण्याव्यतिरेक काहीच करत नाहीत. दौंड बारामती रोडवरील माळरानावर, औद्योगिक क्षेत्रामधील मोकळ्या जागेवर, कुरकुंभ घाटातील आश्रमशाळेच्या परिसरात, दौंड रस्त्यावरील गोळीबार मैदान परिसरात अशा प्रकारचे रासायनिक सांडपाणी सोडले जात होते. त्यामुळे आता जागा बदलून घाटाच्या खाईत तसेच खचखळगे असणाऱ्या ठिकाणी हे पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर अजूनपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. परिणामी हे कृत्य करणारी मंडळी अजून बिनधास्तपणे पाणी सोडून सर्वांच्याच डोळ्यांत धूळ झोकून आपले काम करीत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवता येईल का नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुरकुंभला सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: June 10, 2017 1:56 AM