टाकळी हाजी : जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वीज मंडळ अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिरूर तालुक्यातील अनेक गावांत १९७२ च्या दरम्यान वीज आली. ४० वर्षे उलटून गेली. यांच्या तारा जुन्या झाल्यामुळे ठिकठिकाणी लोंबत्या आहेत. पोपट गायकवाड शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना लोंबत असलेल्या तारांचा शॉक बसून जागीच गेले. मलठण परिसरात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याबाबत मलठण ग्रामपंचायतीने विद्युत वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करून विद्युत तारा बदलण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. यापूर्वी शिरूर येथे सहा महिन्यांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिरूर येथे विजेच्या समस्या सोडविण्याबाबत बैठक झाली होती. यामध्ये आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते. या वेळी जुन्या झालेल्या तारा, खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केली. त्वरित कामे सुरू केली जातील, हे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. मात्र प्रत्यक्षातही दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.सन १९७१ च्यादरम्यान तालुक्यातील अनेक गावांमधील बाजारपेठांमध्ये विजेची कामे झाली. बाजारपेठा कायम गर्दीची ठिकाणे असतात. तेथील तारांसारख्या तुटत असतात. मात्र तरीसुद्धा अद्याप तारा बदलल्या नाहीत. त्यामुळे शेताबरोबर गावातून जाणारा कधी, कुणाचा बळी जाईल, याचा भरोसा राहिलेला नाही.तालुक्यातील अनेक विद्युत रोहित्रांचे फ्यूज बॉक्स, फ्यूज धोकादायक झाले असून, शेतकरी, वायरमन जीव धोक्यात घालून फ्यूज टाकतात.याबाबत माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की मंत्री बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दुरुस्तीची कामे करायची, असा निर्णय झाला, मात्र अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्याला जीव गमवावा लागतो, ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, विजेची चुकीची बिले, कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत तो शेतात कष्ट करीत असून, राज्यातील सर्वच भागातील जुन्या तारा, पोल, ट्रान्स्फॉर्मर बॉक्स दुरुस्तीचे काम हाती घेऊन, शेतकऱ्याला सुरक्षित वीज द्यायला पाहिजे.याबाबत शिरूरचे विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड म्हणाले, की ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या बैठकीनंतर तालुक्यातील दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक करून पाठविले असून, ते मंजूर केले. मात्र निधीअभावी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. निधी उपलब्ध झाल्यास त्वरित दुरुस्तीची कामे केली जातील.याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद नरवडे म्हणाले, की दुरुस्तीबाबत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीला विनंती करण्यात आली होती. एकदा आंदोलनसुद्धा करण्यात आले होते.चेअरमन दत्तात्रय गायकवाड, प्रगतिशील शेतकरी आनंदा गायकवाड म्हणाले, की विजेच्या तारा शेतात लोंबकळत असल्यामुळे महिला, पुरुष, मुलांना शेतात जाताना भीती वाटत आहे. काही ठिकाणी तर विद्युत तारा डोक्याला लागतात. त्यामुळे खालून जाणे, तसेच मशागत करणे धोक्याचे झाले आहे.
जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 6:26 PM
जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठळक मुद्देवीज मंडळ अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार : शेतकऱ्यांचा संतप्त सवालदुरुस्तीबाबत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीला करण्यात आली होती विनंती