पुणे : कुपोषणाचा प्रश्न गंभीर असून ‘लोकमत’ने ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम सुरू केल्याने यातील गांभीर्य समाजापुढे येण्यास मदत होईल, असे मत ग्राव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले.लोकमत, युनिसेफ आणि सिटीझन अलायन्स अगेन्स्ट मालन्यूट्रिशियन या संस्थांच्या वतीने आयोजित ‘पोषण परिक्रमा’ कार्यशाळेचे उद्घाटन गुरूवारी उषा काकडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी ज्येष्ठ राजकीय पत्रकार नीरजा चौधरी, युनिसेफच्या न्यूट्रिशियन तज्ज्ञ राजलक्ष्मी नायर, युनिसेफ महाराष्ट्रच्या कम्युनिकेशन स्पेशालिस्ट स्वाती महोपात्रा, हार्वर्ड पब्लिक हेल्थ स्कूलच्या प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. आस्था कांत उपस्थित होत्या. या कार्यशाळेत ‘लोकमत’च्या विविध आवृत्त्यांमधील पत्रकार सहभागी झाले होते. ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित आणि फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी स्वागत केले. डॉ. आस्था कांत यांनी हेल्थ सर्व्हे अचूक कसा असावा? त्यासाठी अधिकृत माध्यमे कोणती? याविषयी माहिती दिली.काकडे म्हणाल्या, शाळांमधील मुलांना ‘गुड टच बँड टच’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्यानंतर आता ग्राव्हिट्स फाउंडेशन कुपोषणाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. यापुढील काळात कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये फाउंडेशन काम करणार आहे.नीरजा चौधरी यांनी २००६ च्या नॅशनल हेल्थ सर्व्हेनुसार देशातील जवळपास अर्ध्या भागातील मुलांमध्ये कुपोषणाची समस्या असून, यावर काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकांमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा विषय आणणे आवश्यक असून, धोरणात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्या म्हणाल्या.राजलक्ष्मी नायर म्हणाल्या, भारतात कुपोषणामध्ये बिहारनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात कुपोषणाचे प्रमाण हे ३४ टक्के आहे.यात बालक दगावण्याचे प्रमाण हे ९ टक्के आहे. या प्रश्नावर काम करतानाच याबाबत होत असलेल्या सकारात्मक वृत्तांनाही माध्यमांनी स्थान द्यावे.
कुपोषणाचा प्रश्न गंभीर - उषा काकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 1:51 AM