पुणे : राज्य परिवहन महामंडळ सध्या मुंबईत ‘बेस्ट’च्या मदतीला आपली सेवा देत आहे. मात्र, कोरोनाने बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण, डिझेल च्या दरात झालेली वाढ व कर्मचारी संघटनेचा विरोध लक्षात घेता एसटी प्रशासन मुंबईतील आपली सेवा थांबविण्याची दाट शक्यता आहे. सध्या एसटी च्या ५०० बसेस व ३००० कर्मचारी बेस्टच्या सेवेत आहे. पुणे विभागाचे ४० गाड्या व १६० कर्माचारी सध्या बेस्ट साठी सेवा देत आहे. पुढील आठवड्यात एसटी प्रशासन या बाबत आपला निर्णय जाहीर करणार आहे.
मागील वर्षापासून एसटी प्रशासन आपल्या गाड्या व कर्मचारी बेस्ट च्या मदतीला मुंबईत पाठविले आहे. यासाठी एसटीने प्रति किमी ७५ रुपये दर आकारले. यातून एसटी ला मुंबई पालिकेकडून आतापर्यंत ५० कोटी रुपये मिळाले तर आणखी ९० कोटी रुपये येणे बाकी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा केवळ जेवणाचा खर्च २२५ रुपये होत आहे. शिवाय राहण्याचा वेगळा खर्च एसटी प्रशासनाला करावा लागत आहे. यातून एसटीला फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे व कर्मचारी संघटनेचा वाढता विरोध लक्षात घेता एसटी आपली सेवा बंद करण्याच्या निर्णयपर्यंत पोहोचली आहे.
कोट
राज्यभरात एस.टी.चे अंदाजे २१० कर्मचारी कोरोना मुळे मृत्यू पावले. तसेच ९००० कर्मचारी बाधित झाले आहेत. बेस्ट वाहतूक कामगिरी करून गेलेल्या अनेच कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून ही वाहतूक करून गावी परतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाणसुद्धा मोठे आहे. मृत्यूचा सापळा ठरलेली जीवघेणी बेस्ट वाहतूक तात्काळ बंद झाली पाहिजे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस, मुंबई