\Sलोकमत न्युज नेटवर्क
पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्रॉझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड या लसीची परिणामकारकता व अचुकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. काही स्वयंसेवकांना दिलेला अर्धा डोस, ही चुक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन पध्दतींमधील स्वयंसेवकांची संख्या, वयोगट याबाबतही कंपनीकडून स्पष्टीकरण न दिल्याने साशंकता व्यक्त होत आहे. सिरम संस्थेमध्ये याच लसीचे उत्पादन होत असल्याने जगभरातील शंभर राजदुतांचा दौरा अचानक रद्द केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिरम संस्थेकडून आतापर्यंत कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार केले आहेत. कंपनीकडून आर्थिक जोखीम पत्करून हे उत्पादन केले जात असल्याने भारतासह जगभराचे लक्ष या लसीच्या परिणामकारकतेकडे लागले आहे. जगाला गरज असलेल्या कोरोनाच्या लसींच्या जवळपास निम्मे उत्पादन करण्याची सिरमची क्षमता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ‘सिरम’ला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील १०० देशातील राजदुत सिरम संस्थेला भेट देणार होते. पण राजदुतांचा दौरा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लसीच्या विश्वासार्हतेवर जगभरातील काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. त्यामागची कारणेही तशीच आहेत.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका स्वयंसेवकावर लसीचा विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काही दिवस लसीच्या चाचण्याही थांबविल्या होत्या. तसेच अॅस्ट्राझेनेका कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘लसीची परिणामकारक जवळपास ७० टक्के आहे. पहिला डोस अर्धा आणि महिनाभराने एक पूर्ण डोस दिल्यास ही परिणामकारकात ९० टक्क्यांपर्यंत जाते. तर दोन्ही डोस पुर्ण दिल्यानंतर हे प्रमाण ६२ टक्के एवढे आहे.’ कंपनीच्या या दाव्यावरच तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे कंपनीकडूनही आता लस किती प्रभावी आहे, हे पाहण्यासाठी अतिरिक्त चाचण्या घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
----
तज्ज्ञांचे म्हणणे...
- स्वयंसेवकांच्या एका गटाला अर्धा डोस व नंतर एक डोस तर दुसऱ्या गटाला दोन पुर्ण डोस दिले. प्रत्यक्षात कोणत्या पध्दतीनुसार लसीकरण होणार?
- दोन्ही गटातील स्वंयसेवकांचे प्रमाण व वयोगट वेगळा असल्याने परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह
- लस दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग स्वयंंसेवकांना झाला की नाही, याचे स्पषटीकरण नाही
- गोंधळून टाकणाऱ्या आकडेवारीमुळे संभ्रम
- लसीच्या दुष्परिणामांबाबत कंपनीकडून मौन
----
सिरममधील राजदुतांच्या दौऱ्यामध्ये जगभराची लसीची गरज, सध्याचे उत्पादन, क्षमता, वितरण आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता होती. हा दौरा म्हणजे लसीच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होते. पण लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. अॅस्ट्रॉझेनेकाकडून लसीबाबतच्या सर्व शंका दुर केल्यानंतरच हा दौरा पुन्हा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.