लष्कर : ऐतिहासिक शिवाजी मार्केटला १६ मार्चला आणि २६ मार्चला फॅशन मार्केटला लागलेल्या आगीसंदर्भात नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चा झाली. जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला शिवाजी मार्केटमधील आगीबाबत पत्र पाठवून पाच कोटींची मागणी करण्यात आली होती. तसेच, अग्निशमन अधीक्षकांनी आगीसंदर्भात दिलेल्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे शिवाजी मार्केटच्या पुनर्उभारणीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
शिवाजी मार्केटला लागलेली आग ही कॉम्प्रेसर फुटल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेल्या ५ कोटी रुपयांपैकी २.४६ कोटी रुपये स्थानिक आमदारनिधीत वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
फॅशन मार्केट आग दुर्घटनेवर चर्चा करीत असताना यासंबंधी कोरोना महामारी संसर्ग थोडा कमी झाल्यानंतर फॅशन मार्केट संदर्भात वेगळी विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.
फायर ऑडिट होणार
सरदार पटेल रुग्णालयातील दोन वेळेस लागलेल्या आगीनंतर शिवाजी मार्केट व फॅशन मार्केट आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. आता कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व व्यावसायिक आस्थापने, इमारती, शाळा, शिकवण्या, हॉटल्स या सर्वांचे फायर ऑडिट करण्याचे बोर्डाच्या बैठकीत ठरले असून, सदर फायर ऑडिट हे त्रयस्थ मान्यताप्राप्त एजन्सीकडून आणि महाराष्ट्र मुख्य अग्निशामन अधिकाऱ्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्याचे आहे.