कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने मार्गदर्शन केले जात आहे.परंतु, ऑनलाइन शिक्षणाला मयार्दा असल्याने राज्य शासनाने इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणा-या परीक्षा कोरोनामुळे यंदा एप्रिल-मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत.परंतु,अद्यापही बहुतांश शाळांचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. त्याचप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता येते नसल्याचे दिसून आले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी चांगल्याप्रकारे करता यावी,यासाठी विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्न संच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना एससीईआरटीला दिल्या होत्या. त्यानुसार परिषदेने काही विषयांचे प्रश्नसंच तयार केले असून आणखी काही विषयांचे प्रश्न तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित विषयांचे प्रश्न संच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.