लोणावळा : भुशी धरण शनिवारी पहाटे ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याने सकाळपासून भुशी धरणाकडे जाणारा मार्ग, लोणावळा व खंडाळा हाऊसफुल्ल झाले होते. भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी रायवूड काॅर्नरपासून धरणापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर येणाऱ्या मार्गावर रायवूड पोलिस चौकीपासून आयएनएस शिवाजी गेटपासून पुढे एस. काॅर्नरपर्यंत सलग रांग लागली आहे.
पर्यटकांमध्ये चारचाकी वाहनांतून येणाऱ्या पर्यटकांसोबत दुचाकीवरून व लोकलने उतरून पायी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. भुशी धरणावर अक्षरशः पर्यटकांचा पूर आला होता. सहारा पुलासमोरील धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासोबत अनेक पर्यटक डोंगर भागात फिरत होते. खंडाळा राजमाची गार्डन, कार्ला लेणी व भाजे लेणी तसेच धबधबा भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने या सर्व भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावर्षीच्या सिझनमधील आजची कोंडी ही उच्चांकी कोंडी होती.
लायन्स पाॅइंट हरवला धुक्यात
पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या लायन्स पाॅइंट परिसरात रविवारी सकाळपासून असलेला पाऊस व धुक्यामुळे लायन्स पाॅइंट अक्षरशः धुक्यात हरवला होता. विविध भागातून आलेले पर्यटक वर्षाविहारासोबत धुक्यात फिरण्याचा आनंद घेत होते.