पुणे: राज्य सहकार कायद्यात काही बदल हवे आहेत तर त्यावर विचार करून ते त्वरीत सूचवा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सहकार परिषद ही सहकार चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. राज्याचा सहकार कायदा बराच जुना आहे. त्यात बदल करण्याची परिषदेची मागणी योग्य आहे, पण त्यासाठी परिषदेनेच पुढाकार घ्यावा, काय बदल हवे आहेत यावर चर्चा करून ते लवकर सूचवा, म्हणजे विधानसभेच्या येत्या अधिवेशनात ते मांडता येतील असे पवार यांनी सांगितले.
पवार यांनी शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या पुण्यातील कार्यालयास सदिच्छा दिली. परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड तसेच सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीचे फार मोठे योगदान आहे. आता काळानुरूप यात नव्याने काही करण्याची गरज आहे. ही चळवळ सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावरही परिषदेने लक्ष केंद्रीत करावे व त्यातून निघणाऱ्या सुचनांचा अहवाल सरकारला सादर करावा असेही पवार यांनी यावेळी सुचवले. यात राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षांचाही समावेश असावा असे पवार म्हणाले.