पुणे : बाणेर येथे ‘कॉमन मॅन’ आर.के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे संग्रहालय साकारले जात आहे. बांधकामाला सुरुवात झाली आहे. येत्या २४ आॅक्टोबर या आर.के. लक्ष्मण यांच्या जयंतीदिनी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सूतोवाच महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी केले.जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ‘कार्टून्स कट्टा’च्या वतीने आयोजित व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस अध्यक्षस्थानी होते.‘राजकारण आणि महिला’ हा व्यंगचित्रकारांचा आवडता विषय आहे. मात्र, त्यावर एकाही महिलेने कधी आवाज उठवला नाही, अशी मिस्कील टिप्पणी टिळक यांनी केली.चारुहास पंडित यांनी प्रास्ताविकात बाळासाहेब ठाकरे कलादालनात तांत्रिक कारणांमुळे प्रदर्शन किंवा कार्यक्रम करता येत नाहीत; ते बंद असते, असा उल्लेख केला. यावर ‘टेंडरप्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल; त्यानंतर लोकांना ते उपलब्ध करून दिले जाईल,’ असे टिळक यांनी सांगितले.फडणीस म्हणाले, ‘‘जुनेच विषय आज नव्या माध्यमातून व्यंगचित्राद्वारे पुढे येत आहेत. माध्यम कुठलेही असले, तरी व्यंगचित्रकाराला चित्रकलेची भाषा, विनोदबुद्धी, निरीक्षणशक्ती असणे गरजेचे आहे. निकोप मनाने व्यगंचित्रांचा आस्वाद कसा घ्यायचा, यासाठी प्रेक्षकांनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे.’’अतुल पुरंदरे यांनी आभार मानले.प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांचा सहभागबालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाची यंदाची संकल्पना ‘प्रवासी व्यंगचित्रे’ ही आहे. कागदापासून डिजिटलपर्यंतचा प्रवास त्यात मांडण्यात आला आहे. विविध राज्यांतील व्यंगचित्रकारांच्या चित्रांबरोबरच इराण आणि रुमानिया या देशांतील दोन महिला व्यंगचित्रकारांचा प्रदर्शनात समावेश असल्याची माहिती घनश्याम देशमुख यांनी दिली. दिनांक ७ मेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.
बाणेरमध्ये आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक, मुक्ता टिळक यांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 4:17 AM