पुणे : मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. रा. ग. जाधव यांनी वार्धक्यामुळे जाहीर कार्यक्रमांना जाणे पूर्वीच बंद केले आहे. नुकताच राज्य शासनाच्या वतीने त्यांना घरी जाऊन ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रा. ग. जाधव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वार्धक्यामुळे प्रा. जाधव यांना त्रास होत असून, गेले काही दिवस ते अतिदक्षता विभागात होते. अतिदक्षता विभागातून त्यांना बाहेर आणण्यात आले असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये त्यांना दोन वेळा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रा. ग. जाधव रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 4:32 AM