पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड जाहीर केली.
दर तीन वर्षांनी संघाच्या संघचालक पद व अखिल भारतीय सरकार्यवाहपदाच्या नियुक्त्या होतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींची देखील निवड होत असते. कोरोनामुळे ऑनलाईन बैठक घेण्यात आली. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांतील निर्वाचित संघशाखा प्रतिनिधींकडून ही निवड करण्यात आली.
कृषी अभियांत्रिकीमध्ये एम.टेक.पर्यंत शिक्षण झालेले जाधव हे मूळ बेलापूर (श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या नगर येथे स्थायिक आहेत. माती आणि पाणी संवर्धनामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते १९८३ ते २०१२ या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.
त्यांनी संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मावळ, शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हास्तरावर सहा वर्षे काम केले आहे. यापूर्वी संघाच्या जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून २०१३ पासून प्रांत संघचालक पदावर ते कार्यरत आहेत.
फोटो : लक्ष्मण लॉगिनमध्ये