पुणे: गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘अ रा रा खतरनाक’ या गीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ काम केले. फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यांनी सुरुवातीला मालिकांसाठी गाणी लिहिली तसेच ‘ऑल द बेस्ट’ या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेल्या 'लक्ष्य' या मालिकेचे लेखन कुलकर्णी यांचे होते.
प्रवीण तरडे यांच्यासोबत ‘देऊळबंद’ चित्रपटाचे सहलेखन आणि सहदिग्दर्शन केले. देऊळबंद , मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातील गीते त्यांनी लिहिली. ऊन ऊन वठातून, आभाळा आभाळा, गुरुचरित्राचे कर पारायण, हंबीर तू खंबीर तू ही त्यांची गीते गाजली. 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटात त्यांनी काम केले. ‘भूमिका’ या दीर्घांकाची निर्मिती, ‘शिवबा ते शिवराय’ व ‘जीवन यांना कळले हो’ या दृकश्राव्य कार्यक्रमांचे आणि 'सुरक्षित अंतर ठेवा' या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले.