पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फत देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या तब्बल १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असून, नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘सक्सेस स्टोरी’सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे.संघाच्या स्थापनेनंतर देशभरामध्ये संघकार्यासाठी गेलेल्या अनेक प्रचारकांनी सेवा प्रकल्प सुरू केले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक, स्वावलंबन, महिला आदी क्षेत्रात काम सुरू आहे. वनवासी कल्याण आश्रमापासून शहरी भागातील दलित, उपेक्षित घटकांसाठीची शेकडो सेवा कार्यही सुरू आहेत.संघ विविध क्षेत्रात काम करतोय तशाच प्रकारे संघाकडून सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याची माहिती समाजासमोर यावी या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पांमधील ‘सक्सेस स्टोरीज’ समाजापुढे याव्यात असे सुचविले होते. त्यानुसार, मराठीमध्ये हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर स्वयंसेवकांनी केलेल्या मदत आणि बचावकार्याचीही माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच चित्रकुटच्या नानाजी देशमुखांपासून छत्तीसगडच्या चांपा भागात करणारे कात्रेगुरुजी, कर्नाटकच्या दुर्गम भागात काम करणारे अजित कुमार, उत्तराखंडच्या प्रलयानंतर पर्यावरणपूरक विकास मॉडेलचे प्रेरक आणि त्यामधून अनेक गावांची उभारणी करणारे डॉ. नित्यानंद, सेवा भारतीचे विष्णू कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे रमाकांत देशपांडे आदी संघ स्वयंसेवक आणि सेवाब्रतींची माहिती दिली जाईल.संघाच्या माध्यमातूनसंघाच्या माध्यमातून देशभरात आरोग्य क्षेत्रात २५ हजार १३६, शिक्षण क्षेत्रात ८९ हजार ९२६, सामाजिक क्षेत्रात ३८ हजार ९०९, स्वावलंबन क्षेत्रात २० हजार ५४८ सेवा कार्यसुरू आहेत. संघ स्वयंसेवकांसोबतच सर्वसामान्य नागरिक, अभ्यासकांनाही या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळणार आहे.यापूर्वी संघाने देशभर पसरलेल्या सेवा कार्यांचा आढावा घेणारे ‘सेवा सरितांचा अमृतकुंभ’ नावाचे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध केले होते. मात्र, या पुस्तकात काही मोजक्याच प्रकल्पांची माहिती होती. त्यामुळे अधिक व्यापक स्तरावर संघाच्या सेवा प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळाद्वारे मिळणार आहे.नेपाळ, मणिपूर, गुजरात, बिहार, केरळ, उत्तराखंड, राजस्थान आदी भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत व बचाव कार्याचीही माहिती सचित्र अपलोड करण्यात येणार आहे.
रा. स्व. संघाची ‘सेवा गाथा’ आॅनलाइन; सक्सेस स्टोरी असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:38 AM