लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातले यंदाचे रब्बी क्षेत्र ६० लाख हेक्टर असेल. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार कृषी विभाग काम करत असून त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शंभर सावता माळी रयत बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कृषी आयुक्तालयात भुसे यांनी मंगळवारी (दि. ७) राज्याच्या रब्बी हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी माहिती दिली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी या वेळी उपस्थित होते.
भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अर्थकारणात रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्यामुळेच कृषी विभागाने याकडे गंभीरपणे पाहावे. महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये अचूकता आली आहे. सर्व काही एकाच छताखाली आल्याने शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला आहे.
सोयाबीन, कापूस, करडई ही राज्यातील प्रमुख पिके आहेत. त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या सहभागाने परिषदा घेण्यात येत असल्याचे भुसे म्हणाले. राज्यात ३५ हजार १०० सावता माळी रयत बाजार होणार आहेत. त्यापैकी १५ हजार २५१ सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना थेट खरेदीदारांबरोबर जोडून देण्यात येत आहे. द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट यांचा समावेश रोजगार हमी योजनेत केला असल्याचे भुमरे यांनी सांगितले.