पुणे : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची पेरणी गेल्या वर्षीइतकी झाली आहे. हरभऱ्याची लागवड मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७० टक्के इतकीच झाली आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर इतके आहे. आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ७९ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३२.२६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे ७८ टक्के इतकी आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख २० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ४६.७७ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ९७ टक्के इतके होते.
आतापर्यंत केवळ ८७ हजार २१६ हेक्टरवरच गव्हाची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ८.३२ टक्के इतके आहे. आतापर्यंत ७ लाख २६ हजार ८२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३३.७४ टक्के इतके आहे. मक्याच्या लागवडीत घट झाली. आतापर्यंत केवळ ७९ हजार ३१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईची पेरणी १५ हजार २६६ हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १४ हजार ३६ हेक्टर इतके होते.
पुणे विभागात सर्वाधिक ५ लाख ३५ हजार ५४० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असून, सरासरी प्रमाण ४६.६० टक्के आहे. त्याखालोखाल लातूर विभागात ५ लाख २८ हजार २७२ हेक्टर अर्थात सरासरीच्या ३८.७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वांत कमी पेरणी नाशिक विभागात केवळ १८ हजार ७५७ हेक्टर अर्थात सरासरीच्या तुलनेत केवळ ३.६९ टक्के इतकी झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र ९७ टक्के इतके झाले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. उसाच्या तोडणीनंतर हरभऱ्याच्या लागवडीत डिसेंबरअखेर वाढ होण्याची अपेक्षा आहे.
- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे