पुणे : आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. १९९२ च्या पोटनिवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली होती. त्यामुळे यावेळी काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार आहेत. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. परंतु सकाळी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होताच रवींद्र धंगेकर टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे.
धंगेकर म्हणाले, मी आमदार मुक्ता टिळक यांच्या २० वर्षांपासून संपर्कात होतो. अनेक सामाजिक कामे करताना त्यांच्याशी चर्चाही करत असे. त्यामुळे आज टिळक कुटुंबियांची भेट घेत आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसपक्ष श्रेष्ठींनी मला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे,"
या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून दोन्ही नावांची घोषणा झाली असून चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे.
रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती.