लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : तिन्हेवाडी रोड, कॅनाल परिसरात राजगुरुनगरमधील एका हॉटेलचा पोते भरून कचरा टाकताना एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले. नागरिकांनी तोच कचरा उचलत पुन्हा संबंधित हॉटेलच्या दारात आणून टाकला. पुन्हा कचरा टाकल्यास थेट हॉटेलवर कारवाईचा इशारा नागरिकांनी दिला.
राजगुरुनगर नगरपरिषदेमार्फत शहरात रोज वाहने फिरवून कचरा गोळा केला जातो. मात्र अनेक नागरिक घर, परिसरातील कचरा, हॉटेलचा कचरा गाडीच्या वेळेत कचरा न देता तसेच साठवून ठेवतात. नंतर जमेल तसा आडबाजूला नेऊन टाकतात. यासाठी विविध वाहनांचा वापर होतो. शिवाय रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त कचरा फेकून दिला जातो. शहराच्या चोहोबाजूंनी असलेल्या अशा विविध रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. यामुळे या परिसरात नेहमी दुर्गंधी पसरली असते. याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. तिन्हेवाडी रस्ता परिसरातील नागरिक कचऱ्याच्या समस्याने हैराण झाले होते. त्यांनी पाळत ठेवून येथे कचरा टाकायला येणाऱ्या व्यक्तींना पुन्हा असा प्रकार करु नये म्हणून तंबी दिली होती. मात्र, पुन्हा कचरा टाकला जात होता. यामुळे नागरिक कचरा टाकणाऱ्यांच्या मागावर होते. हॉटेल कामगारांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका असे सांगितले होते, तरी ते परस्पर तेथे कचरा टाकण्यास गेले, अशी हॉटेलमालकांची प्रतिक्रिया होती. तरीही त्यांनी दिलगिरी व्यक्त करून यापुढे यासंबंधी काळजी घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे वाद टळला. कॅनाल परिसरात, तेथील वस्तीजवळ हॉटेलचा कचरा आणि घरगुती कचरा देखील मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. वादाचे प्रसंग टाळण्यासाठी आणि आपले शहर स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी यापुढे कोणीही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. हॉटेलचालकांनी आपल्या कचऱ्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन नागरिकांनी केले.
फोटो ओळ.: कॅनालजवळ टाकलेला कचरा पुन्हा हॉटेलच्या दारात नागरिकांनी टाकला.