पिंपरी : खराळवाडी, गांधीनगर या दोन प्रभागांसाठी खराळवाडीतील बालभवन येथे क्षेत्रीय सभा सुरू असताना, दुपारी तीनच्या सुमारास उपस्थितांपैकी काहींनी थेट नगरसेवकांवर आरोप केले. त्यामुळे स्थानिक नगरसेवक सद्गुरू कदम यांनी संबंधितांना हटकले. त्यावर आक्षेप घेत कोणीही दादागिरी, दमबाजी करू नये, असे सांगण्याचा प्रयत्न नगरसेविका गीता मंचरकर यांनी केला. मंचरकर यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित काही महिलांनी त्यांच्यावर चाल केली. त्यांना धक्काबुक्की केली. शाब्दिक खडाजंगी आणि एकमेकांवर धावून जाण्याच्या प्रकाराने क्षेत्रीय सभेत राडा झाला. हा वादंग थेट पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. संत तुकारामनगर पोलीस चौकीत नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर, स्थानिक नगरसेवक कैलास कदम, स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख, माजी महापौर प्रकाश रेवाळे दाखल झाले. कार्यकर्ते, नागरिक यांचा मोठा जमाव संत तुकारामनगर पोलीस चौकीत जमा झाला. खराळवाडीत क्षेत्रीय सभेत झालेल्या राड्यामुळे दोन्ही प्रभागांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बालभवनमध्ये प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांची क्षेत्रीय सभा घेण्यात आली. त्या वेळी नगरसेवकांचे प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे, त्यांचे लक्ष भलतीकडेच आहे, असा आरोप एका कार्यकर्त्याने केला. त्या वेळी कदम यांनी त्या कार्यकर्त्यास हटकले. त्यावर कोणीही दमबाजीचा प्रयत्न करू नये, असे नगरसेविका मंचरकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी उपस्थित महिलांनी मंचरकर यांना धक्काबुक्की केली. अधिकारी दत्तात्रय फुंदे व अन्य अधिकाऱ्यांनी सभेतील राडा पाहून तेथून काढता पाय घेतला.(प्रतिनिधी)
क्षेत्रीय सभेत राडा; प्रभागात तणाव
By admin | Published: December 11, 2015 12:48 AM