लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड परिसरात भाईगिरी करणाऱ्या टोळक्याने हातात कोयते व हॉकीस्टिक घेऊन राडा घातला. त्यांना अडविणाऱ्या एका नागरिकावर त्यांनी वार करून जखमी केले. तसेच या परिसरातील ९ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी केदार पाठक (वय ३७, रा. लिमयेनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना धायरीतील लिमयेनगर गल्लीतील निसर्ग सोसायटीसमोर सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. पोलिसांनी मन्या कट्टमणी, करण्या व इतर तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे धायरीतील लिमयेनगर परिसरात राहतात. सोमवारी मध्यरात्री आरोपी लिमयेनगर भागात हातात लोखंडी कोयते, हॉकीस्टीक व दगड घेऊन रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तसेच, रस्त्याने येणाऱ्याा-जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत धमकावत होते. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. हा सर्व गोधळ सुरू असल्याने फिर्यादी हे घरातून बाहेर आले. त्यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी आम्ही या एरियाचे भाई आहोत, खाली कुणी आल्यास त्याचा मुडदा पाडू, असे म्हणत कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले. पण पाठक यांनी तो वार चुकवला.
एवढ्यावरच टोळक्याने न थांबता दहशत निर्माण करत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कार व रिक्षा अशा ९ वाहनांची तोडफोड करून ३२ हजारांचे आर्थिक नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टोळके पसार झाले होते. सहायक पोलिस निरीक्षक सलगर अधिक तपास करत आहेत.