लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केरळमधील परिचारिका आणि पुण्यातील परिचारिकांच्या पगारातील तफावतीवरुन नाराज पुण्यातील परिचारिका आंदोलन करीत होत्या. त्यावेळी तेथील हाऊस किपिंग कर्मचारी आणि जंबो हाॅस्पिटलच्या बॉऊन्सरमध्ये आज राडा झाला. या वेळी बाऊन्सर आणि परिचारिका यांच्यात हाणामारी झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केरळवरुन आणण्यात आलेल्या परिचारिकांना पुण्यातील परिचारिकांपेक्षा अधिक पगार दिला जातो. आम्ही सर्व एकच काम करतो, तरीही त्यांना आमच्या पेक्षा अधिक पगार दिला जातो. त्यांच्या इतकाच पगार आम्हाला मिळावा, अशी येथील परिचारिकांची मागणी आहे. जंबो हॉस्पिटलमध्ये काम करणार्या परिचारिका आणि वॉर्ड बॉईज यांचे पगार रखडले होते. त्यांना आज पगार दिला जात होता. त्यादरम्यान तेथील बाऊन्सर्स आणि हाऊस किपिंग कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. यातून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना भिडले. त्यानंतर ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेथे पोलीस अधिकार्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना समजावून सांगितल्यावर ते परत निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.