विज्ञान दिनानिमित्त आयोजन; दोन दिवस उपक्रम
पुणे : पुण्यातील हौशी हॅम रेडिओधारकांतर्फे विज्ञान दिवस (दि. २८) आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. हौशी रेडिओ परवाना धारक सर्वात उंच अशा वेताळ टेकडीवरून रेडिओ संदेशाची देवाणघेवाण व आकाशदर्शन कार्यक्रम २७ व २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे, अशी माहिती संयोजक विलास रबडे यांनी दिली.
पाषाण भागातील वेताळ टेकडी सर्वात उंच ठिकाण आहे. ते समुद्रसपाटीपासून सुमारे २६०० फूट उंचावर आहे. वेताळबाबा मंदिराजवळील उपक्रमात पुणे येथील १५ हौशी रेडिओ परवानाधारक सहभागी होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अँटेना उभारून सर्व प्रकारचे रेडिओ संदेशवहनाचे प्रयोगही हॅम मंडळी करणार आहेत. कार्यक्रम शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता सुरू होईल व अखंडपणे ३३ तास सुरू राहील व त्याची रविवारी दुपारी सांगता होईल. भारतातील वेगवेगळ्या भागातून अशी सुमारे ४१ केंद्रे कार्यरत असणार आहेत.
शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या अनौपचारिक सभेत गिरिप्रेमीचे उमेश झिरपे, फायर ब्रिगेडचे एकबोटे, कोल्हापूरचे हॅम नितीन ऐनापुरे व पुण्याच्या सुजाता कोडग आपले रेडिओ संदेशवहनाबाबत अनुभव कथन करतील, असे रबडे यांनी सांगितले.
—————
आकाशदर्शन शनिवारी
ज्योर्तिविद्या परिसंस्था व अहमदनगर येथील स्पेस ओडेसीतर्फे आकाशदर्शनाचा कार्यक्रम शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री ७:३० ते ९ या वेळात आयोजित केला आहे. या उपक्रमासाठी पुण्यातील सायकॉम् व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे.